congress Farmers Bill

चंदीगड : हरयाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीच्या सरकारविरोधात काँग्रेस पार्टीने अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे गटनेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, यासाठी काँग्रेस पार्टी विधानसभेचे विशेष सत्र बोलाविण्याची मागणी करेल.

मनोहरलाल खट्टर सरकारने नाराज शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखल्याने घोडचूक केली आहे. त्यांनी नागरिकांचा आणि दोन्ही सभागृहांचा विश्वास गमावला आहे. काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची भेट घेऊन विधानसभेचे विशेष सत्र आयोजित करण्याची मागणी करेल, असे हुड्डा म्हणाले. दुसरीकडे दिग्विजय चौटाला यांच्या नेतृत्त्वाखाली जजपाच्या काही नेत्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांची भेट घेतली आहे.

योग्यवेळी सर्वकाही सांगणार

भाजपाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न विचारला असता हुड्डा म्हणाले की, आताच मी सगळ्या गोष्टींचा खुलासा करू शकत नाही. दोन अपक्ष आमदारांनी यापूर्वीच भाजप-जजपा युतीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे आणि जजपाच्या काही आमदारांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवित सरकारविरोधात निवेदने दिली आहेत, असेही ते म्हणाले.

काही आमदार दुहेरी भूमिकेत

काही आमदार दुहेरी भूमिका निभावत असल्याचा दावाही हुड्डा यांनी केला आहे. एकीकडे हे आमदार सरकारविरोधी वकव्ये करीत आहेत, तर दुसरीकडे सरकारला पाठिंबाही देत आहेत. अविश्वास ठरावानंतर हे स्पष्ट होईल की, कोण शेतकऱ्यांच्या समर्थनात आहे आणि कोण विरोधात, असेही ते म्हणाले. जेव्हा शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत तेव्हा जजपा आणि काही अपक्ष आमदार सत्तेचे सुख भोगत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.