Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर विशेष व्यवस्था

सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यावेळी भाषणात‘आत्मनिर्भर भारता’वर भर देतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नवी दिल्ली : 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला ४००० हून अधिक लोकांना निमंत्रण दिले आहे. यात नेते, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे, अशी माहिती शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने दिली. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यावेळी भाषणात‘आत्मनिर्भर भारता’वर भर देतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन पाहुण्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

‘गार्ड ऑफ ऑनर’च्या सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जागेवर एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले आहे. सर्व निमंत्रितांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सॅनिटायझरचीही व्यवस्था केली आहे. रांगेची गर्दी टाळण्यासाठी मोठ्या चौकटीचे दरवाजे लावले आहेत.

सर्व प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. फक्त आमंत्रित व्यक्तींनाच यात भाग घेता येणार आहे.. आरोग्य सुविधा आणि अ‍ॅम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली असून सर्व कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग पालनाच्या सूचना दिल्या आहेत.