संघाच्या गुंडांची बंगालमध्ये घुसखोरी; ममता बॅनर्जींचा घणाघात

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आणि ज्यांना टीएमसीमधून हद्दपार करण्यात आले त्यांनी भाजपचा आश्रय घेतला आणि संघाच्या गुंडांनी बंगालमध्ये घुसखोरी केली, अशा शब्दात हल्लाबोल केला.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. बुधवारी कूचबिहार येथील रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आणि ज्यांना टीएमसीमधून हद्दपार करण्यात आले त्यांनी भाजपचा आश्रय घेतला आणि संघाच्या गुंडांनी बंगालमध्ये घुसखोरी केली, अशा शब्दात हल्लाबोल केला.

पैसा व ताकदीचा वापर करतोय् भाजपा
लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा संदर्भ देत पैशाचा आणि ताकदीचा बळावर भाजपने निवडणूक जिंकली असली तरी टीएमसीने वर्षभर जनतेसाठीच काम केले असे त्या म्हणाल्या. सुरुवातीपासूनच जे पक्षात होते, ते सर्वच पक्षाबरोबर आहेत. काही निघून जाऊ शकतात परंतु लक्षात ठेवा आपण आपला ड्रेस बदलू शकता परंतु विचारधारा नाही.

मोफत रेशन योजना सुरूच राहणार   

राज्य सरकार जनतेला अद्यापही मोफत रेशन देत असून ही योजना निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही सुरूच राहणार असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. भाजपा नेते रवींद्रनाथ टागोर यांचे जन्मस्थळ बदलवू इच्छित आहेत. जे येथे आले आहेत ते सर्व बाहेरील आहेत. चंबळमधून दरोडेखोरच येथे आले आहेत असे सांगत आरएसएसच्या गुंडांनी बंगालमध्ये घुसखोरी केली असून आरएसएसच्या हिंदू धर्माच्या ब्रँडवर विश्वास नसल्याची घणाघाती टीकाही ममता बॅनर्जींनी केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की सर्व निर्वासित वसाहत कायदेशीर करण्यात आल्या आहेत. जे सीमेपलीकडून आले आहेत त्यांनी काळजी करू नये असेही ममतांनी ठणकावले.

अमित शाहांचे मिशन बंगाल; शेतकऱ्याच्या घरी करणार जेवण

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आक्रमक होत आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याबरोबरच अमित शाह यावेळी मिदनापूरमधील शेतकऱ्याच्या घरी जेवण करणार असल्याची माहिती सूत्राने दिली. कृषी कायद्याच्या मुद्यावर कोंडीत सापडलेल्या भाजपाने आता शेतकऱ्यांमध्ये जाऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्षांनीही असा प्रयोग केला होता. अमित शाह आगामी १९ आणि २० डिसेंबर रोजी बंगाल दौऱ्यावर आहेत.