IPS officer arrested for taking bribe

राजस्थान : खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे या म्हणीला साजेसे कृत्य राजस्थानमधील एका IPS अधिकाऱ्याने केले आहे. भ्रष्टाचाराविरोधात भाषण ठोकणाऱ्या IPS अधिकाऱ्याला लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाषण संपल्यानंतर अवघ्या तासाभरात या अधिकाऱ्याला  लाच घेताना अटक झाली.

माधोपूर येथे बुधवारी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरारष्ट्रीय दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डीएसपी मीणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात भाषणही केली. “आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा,” असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

विशेष म्हणजे या भाषणाच्या एक तासानंतर डीएसपी मीणा यांना ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यालाही अटक झाली. एसीबीच्या कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला खुद्द एसीबीनंच जाळ्यात अडकवल्याचं उदाहरण पहिल्यांदाच पहायला मिळाले.