Kanadi police bullying; Maharashtra-Karnataka dispute erupts over inhumane beating of four youths from Belgaum

  'मराठी भाषिक वाघ आहे' असे स्टेटस ठेवले म्हणून पोलिसांनी बेळगावातील चार तरुणांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकार आणि स्थानिक पोलिसांची गुंडगिरी सुरू असल्याचे दिसत आहे. सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने एकमेकांवर कुरघोडी करत असतानाचा तिथल्या पोलिसांनीही हे माणुसकीला लाजवेल असे कृत्य केले आहे

    बेळगाव :  ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असे स्टेटस ठेवले म्हणून पोलिसांनी बेळगावातील चार तरुणांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकार आणि स्थानिक पोलिसांची गुंडगिरी सुरू असल्याचे दिसत आहे. सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने एकमेकांवर कुरघोडी करत असतानाचा तिथल्या पोलिसांनीही हे माणुसकीला लाजवेल असे कृत्य केले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील मच्छे गावातील हे चार तरुण आहे. या चौघांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर मराठीत स्टेटस ठेवले होते. या चारही तरुणांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून कानडी पोलिसांनी जाब विचारला आणि बेदम मारहाण केली. पाठ, हात आणि पायांवर बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली.

    या मारहाणीचे वळ तरुणांच्या अंगावर उमटले आहे. कानडी पोलिसांकडून सातत्याने मराठी भाषिकांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप स्थानिक मराठी भाषिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार? असा संतप्त नागरिक विचारत आहे.

    या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. दरम्यान, २० मार्चपर्यंत बेळगाव महापालिकेवर कन्नड रक्षण वेदिकेने लावलेला ध्वज न काढल्यास पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड व्यावसायिकांचे सर्व व्यवसाय बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. कोल्हापुरात संजय पवार आणि विजय देवणे यांनी पत्रपरिषद घेऊन हा इशारा दिला आहे. तसेच चार तरुणांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेधही नोंदवला.