monsoon temple kanpur

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) एक असं मंदिर आहे, जे मान्सूनची(Monsoon Predicting Temple) अत्यंत अचूक भविष्यवाणी करतं.

    कानपूर : भारतामध्ये अनेक मंदिरे(Temple) आहेत. प्रत्येक मंदिराचं वेगळं महत्त्व आणि वेगळी अख्यायिका आहे. यातील काही मंदिरं ही वास्तुकलेचे अप्रतिम नमुने आहेत. काही वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व असलेलीदेखील आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) एक असं मंदिर आहे, जे मान्सूनची(Monsoon Predicting Temple) अत्यंत अचूक भविष्यवाणी करतं. भारतीय पुरातत्व विभागानं जतन केलेल्या वारसा स्थळांमध्ये समावेश असलेलं हे मंदिर शास्त्रज्ञांसाठीही गूढ ठरलं आहे.

    कानपूरपासून अंदाजे ५० किलोमीटर दूर असलेल्या या मंदिराला मॉन्सून मंदिर म्हणून ओळखतात. या मंदिरात भगवान जगन्नाथाची मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर मॉन्सून दगड आहे. या दगडावरून खाली पडणाऱ्या थेंबांवरून पाऊस किती पडणार याचा अंदाज लावला जातो. जर जास्त थेंब पडले तर जास्त पाऊस होण्याची शक्यता असते. ही केवळ मान्यता नसून यात विज्ञानही आहे. मंदिर तयार करताना तशी रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या भिंती आणि छत तशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे. त्यामुलं मॉन्सून सुरू होण्याच्या ५-७ दिवसांपूर्वीच इथं संकेत मिळतो.

    असं म्हटलं जातं की हे मंदिर अनेकदा तोडण्यात आलं आणि पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. जेव्हा देशामध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर होता, तेव्हाच्या स्थापत्य कलेचा प्रभावही मंदिरात आहे. मंदिराच्या दगडांच्या कार्बन डेटिंगमुळं ते ४२०० वर्षे जुनं असल्याचं समजतं. मंदिर तीन भागांमध्ये तयार केलेलं आहे. गर्भगृहाचा लहान भाग, नंतर मोठा भाग आहे. हे वेगवेगळ्या काळात तयार केले आहेत. इथं विष्णूची मूर्ती स्थापित आहे. विष्णूच्या २४ अवतारांच्या आणि पद्मनाभ स्वामींची मूर्ती आहे.

    मंदिराची देखभाल करणारे केपी शुक्ला यांनी सांगितलं की, मंदिराच्या इतिहासाबाबत मतभेदही आहेत. जुन्या काळापासून विविध राजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात दगडी पद्म चिन्हंदेखिल आहे. अशा चिन्हांची पुजा सिंधु संस्कृतीमध्ये केली जायची, असं सांगितलं जातं.

    मंदिराला मॉन्सूनच्या भविष्यवाणीसाठी ओळखलं जातं. तसंच शिखरावरील सूर्यचक्राचंही महत्त्व सांगितलं जातं. या सूर्यचक्रामुळं कधीच मंदिरावर वीज पडत नाही, असं म्हटलं जातं. मंदिर रथाच्या आकारातील आहे. लांबून भाविक इथं येतात. भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याच्या मते याठिकाणी शास्त्रज्ञ नेहमी येत जात असतात. पण त्यांना फार काही माहिती मिळालेली नाही. सध्या हे मंदिर सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एक तासच उघडं असतं.