कर्नाटकने अलमट्टी धरणावर रियल टाईम डेटा सिस्टीम बसवावी; जयंत पाटलांची मागणी

महाराष्ट्राने पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रियल टाइम डेटा सिस्टीम बसवली आहे, मात्र, कर्नाटक सरकारने अद्याप ही सिस्टीम बसविली नाही. कर्नाटक प्रशासनाने तातडीने ही सिस्टीम अलमट्टी धरण परिसरात बसवावी अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

    बंगळुरु : महाराष्ट्राने पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रियल टाइम डेटा सिस्टीम बसवली आहे, मात्र, कर्नाटक सरकारने अद्याप ही सिस्टीम बसविली नाही. कर्नाटक प्रशासनाने तातडीने ही सिस्टीम अलमट्टी धरण परिसरात बसवावी अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

    दरम्यान अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या नियंत्रणासंबंधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत जयंत पाटलांनी ही मागणी केली.  कोल्हापूर, सातारा, सांगली भागात 2019 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महाराष्ट्र सरकार आधीच हालचाली करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची बंगळुरुत भेट घेतली. त्यावेळी जलसंपदा खात्याचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.

    रियल टाइम डेटा सिस्टीममुळे पाण्याच्या प्रवाहाची माहिती अचूक मिळते, त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकू असंही जयंत पाटील म्हणाले. संभाव्य महापुराबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारचा समन्वय आहे असंही त्यांनी सांगितलं.  संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही राज्याचे शासन सर्व तयारीनिशी समर्थ आहेत असंही जयंत पाटील म्हणाले.

    मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि जयंत पाटील यांच्या या भेटीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. अलमट्टीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील अनेक भागांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणूनच या पूर नियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने करणे आवश्यक आहे. 2019 महाराष्ट्रमध्ये पूर आल्यावर कर्नाटक सरकार पाणी सोडल्यानंतर सांगली कोल्हापूरमधील पाणी ओसरलं होत. पण तोपर्यंत या भागात मोठं नुकसान झालं होतं.