खट्टर सरकारची उद्या अग्निपरीक्षा; काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव, भाजपाचा व्हीप

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे कोणते आमदार सरकारच्या पाठीशी आहेत आणि कोणते शेतकऱ्यांच्या हे सुद्धा स्पष्ट होईल.

  चंदीगड: राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने आज बुधवार १० रोजी विधानसभेत अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकार संकटात सापडले आहे. दुसरीकडे, भाजपाने पक्षाच्या सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याबाबत व्हीपही जारी केला आहे. अविश्वास प्रस्तावावेळी सर्व सदस्यांना उपस्थित राहणे बंधनकारक असून ते पक्षाविरोधात मतदान करू शकणार नाहीत. हरयाणात भाजपा- जेजेपीच्या नेतृत्वातील आघाडीचे सरकार आहे.

  कृषी कायद्यांना विरोध
  हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे कोणते आमदार सरकारच्या पाठीशी आहेत आणि कोणते शेतकऱ्यांच्या हे सुद्धा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. दुसरीकडे, संयुक्त शेतकरी मोर्चाने आमदारांना सरकारविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

  सरकार स्थिर
  अविश्वास प्रस्ताव सादर करणे विरोधकांचे कामच आहे आणि त्यावर आमदारांचेही मत असतेच. त्यापूर्वीच कोणाच्या मनात काय चाललेय हे कसे कळणार? परंतु सरकार स्थिर आहे. जजपाचे आमदार उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या पाठीशी आहेत. जनतेला दिलेले आश्वासन ते पूर्ण करीत आहेत. मुख्यमंत्री खट्टर व चौटाला यांनी सुशिक्षित युवकांना खासगी क्षेत्रात रोजगार मिळवून देण्याचे निश्चित केले आहे.
  – सरदार निशान सिंह, प्रदेशाध्यक्ष जजपा