आज पश्चिम बंगालची रणधुमाळी शांत होणार, सुरू आहे शेवटच्या टप्प्याचं मतदान

पश्चिम बंगाल विधानसभेच्या आठव्या टप्प्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. एकूण ३५ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मालदा, मुर्शिदाबाद, बिरभूम आणि उत्तर कोलकाता या जिल्ह्यांमध्ये आज मतदान पार पडणार असून २८५ उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. 

    गेल्या २ महिन्यांपासून अधिक काळ सुरू असलेली पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आजपासून थंडावणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी आठव्या अर्थात शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान सुरू झालं असून आज संध्याकाळनंतर बंगालमधलं राजकीय वातावरण शांत होणार आहे.

    पश्चिम बंगाल विधानसभेच्या आठव्या टप्प्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. एकूण ३५ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मालदा, मुर्शिदाबाद, बिरभूम आणि उत्तर कोलकाता या जिल्ह्यांमध्ये आज मतदान पार पडणार असून २८५ उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत.

    बंगाल विधानसभेच्या यापूर्वीच्या टप्प्याचं मतदान झालं तेव्हापासूनच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागल्याचं चित्र आहे. बुधवारी राज्यात १७ हजार २०७ रुग्णांची नोंद झालीय. आतापर्यंत २४ तासांत सापडलेल्या रुग्णांचा हा सर्वोच्च आकडा आहे. तर बुधवारी एका दिवसांत ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलीय. तर बिरभूममध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान अर्धा तास उशीरा सुरू झालंय.

    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन मतदान पार पडतंय.  नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावं, मतदान केंद्रावर एकमेकांपासून किमान ६ फूट अंतर राखून उभं राहावं आणि प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरची सोय असावी, अशा सूचना कऱण्यात आल्यात.