sharad pwar

दिल्ली :  मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरुन देशात गदारोळ माजला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर राजकारणही सुरु झाले आहे.

या मुद्द्यावरून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शरद पवार आणि इतर नेत्यांवर टीका केली आहे. “शेतकरी हा देव असतो. पंतप्रधान मोदी यांनी आणलेला कायदा हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कायदा क्रांती घडवण्याचे सामर्थ्य राखतो. पण, राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेतेमंडळी आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत”, अशा शब्दात त्यांनी शरद पवार आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांवर चौहान यांनी टीका केली आहे.

दरम्यान, मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासमवेत पाच विरोधी पक्षांचे नेते आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये असणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते संध्याकाळी पाच वाजता भेटणार असल्याची माहिती आहे. कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे.