काळ्या बुरशीवरील औषधे मोफत उपलब्ध करा; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

काळी बुरशीच्या आजाराला आयुष्यमान भारत योजने अंतर्गत संरक्षण नाही. अन्यही विमा योजनांमध्ये हा आजार कव्हर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे. असं सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.

    नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी काळ्या बुरशीचा आजार मोठ्या प्रमाणावर उद्‌भवला असून केंद्र सरकारने या रोगावरील औषधे मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

    दरम्यान काळी बुरशीच्या आजाराला आयुष्यमान भारत योजने अंतर्गत संरक्षण नाही. अन्यही विमा योजनांमध्ये हा आजार कव्हर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे. असं सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.

    तसेचं म्युकरमायकोसिस हा आजार केंद्र सरकारने साथीचे रोग म्हणून जाहीर केला आहे. याचा अर्थ आता केंद्र सरकारने त्याविषयीच्या औषधांची उपलब्धता वाढवण्यावरही लक्ष देण्याची गरज असून ती औषधे रूग्णांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्याचा पुरवठाही सुरळीत राहील याचीही जबाबदारी केंद्राने पार पाडायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे. सोनियांनी म्हटले आहे की या आजारावर लिपोसोमॉल ऍम्फोटेरिकिन-बी हे अत्यंत गरजेचे औषध आहे आणि बाजारात त्याची सध्या मोठी चणचण जाणवत आहे.

    देशात म्युकरमायकोसिस हा आजार मोठया प्रमाणात फैलावत असून त्यातून काही रूग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्याच्या औषधांच्या संबंधात सध्या ओरड निर्माण होऊ लागली आहे त्या पार्श्‍वभूमीवर सोनिया गांधी यांनी मोदींना हे पत्र पाठवले आहे.