Good News – ममता बॅनर्जींची नवी घोषणा, पत्रकारांना कोरोना योद्ध्यांचा दर्जा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा (mamata banerjee declared journalists corona warriors) केली आहे.

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत(West Bengal Election 2021) तृणमूल काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्या कोलकातामध्ये बोलत होत्या. त्यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारच्या अनेक योजना आणि सोयी सुविधांचा पत्रकारांना लाभ घेता येणार आहे.


    ममत बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “नंदीग्राममधील निवडणूक अधिकाऱ्याने पुन्हा मतमोजणीला परवानगी दिली तर माझ्या जीवाला धोका असल्याचं पत्र लिहिल्याची माहिती मला मिळाली आहे. तब्बल ४ तास मतमोजणी केंद्रावर सर्व्हर डाऊन होतं. राज्यपालांनीही माझं अभिनंदन केलं होतं. मात्र, अचानक सर्व काही बदललं.”


    त्या पुढे म्हणाल्या की, “प्रत्येकाने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे आणि कोणत्याही हिंसक घटनेत सहभागी होऊ नये. आपल्याला माहिती आहे की भाजप आणि केंद्रीय यंत्रणेने आपल्यावर खूप अत्याचार केले आहेत. मात्र, आपल्याला शांतता ठेवायची आहे. सध्या आपल्याला कोविड- १९ विरोधात लढायचं आहे”.

    ममता बॅनर्जी म्हणाल्या, “केंद्र सरकारने देशभरात प्रत्येकाचा समावेश असेल अशा व्यापक लसीकरणासाठी ३०,००० कोटी रुपये मंजूर करावेत अशी आम्ही विनंती करतो.मला मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सध्या सर्व लसी आणि ऑक्सिजन केवळ २-३ राज्यांमध्ये पाठवत आहे.”