‘हे राम राज्य नव्हे किलिंग राज्य’ लखीमपूर खेरीतील हिंसाचाराबाबत ममता बॅनर्जींनी व्यक्त केला संताप

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून (Lakhimpur Kheri Violence) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee Reaction After Lakhimpur Kheri Violence) यांनी भाजपावर टीका केली.

    लखीमपूर खेरी हिंसाचारात(Lakhimpur Kheri Violence) ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ शेतकरी तर ४ जण हे भाजपा कार्यकर्ते असल्याचं समोर आले आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष(Ashish Mishra) विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली. देशातील विरोधी पक्ष देखील या घटनेविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee Reaction After Lakhimpur Kheri Violence) यांनी भाजपावर टीका केली.

    “भाजपा उत्तर प्रदेशात राम राज्याविषयी बोलते पण ते राम राज्य नाही, किलिंग राज्य आहे. लोक मारले जातात आणि सरकार कलम १४४ लागू करते. एका मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खेरीमध्ये इतक्या शेतकऱ्यांची हत्या केली. आम्ही त्याचा निषेध करतो,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या प्रचंड हिंसाचारावर भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. त्याचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. भाजपा सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांना फक्त अनियंत्रित राज्यकारभार हवा आहे. हे राम राज्य नाही, हे किलिंग राज्य आहे.”