ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप: मारले जाण्याच्या भीतीमुळे रिटर्निंग अधिकाऱ्याने केली नाही मतांची पुनर्मोजणी, नंदीग्राममधील मतमोजणीवर व्यक्त केला संशय

पं. बंगालमध्ये विजय संपादित करुन संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामच्या मतमोजणीबाबत संशय व्यक्त केला आहे. आपल्या पराभवामागे काही गुपीतं दडलेली आहेत. हरवण्यासाठी मोठे षडयंत्र रचला गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

    कोलकाता : पं. बंगालमध्ये विजय संपादित करुन संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामच्या मतमोजणीबाबत संशय व्यक्त केला आहे. आपल्या पराभवामागे काही गुपीतं दडलेली आहेत. हरवण्यासाठी मोठे षडयंत्र रचला गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

    नंदिग्राममधील रिटर्निंग अधिकारी हे मतमोजणी करताना घाबरलेले होते. जर पुनर्मोजणी केली तर, जीवाला धोका असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते असे आपल्याला एकाने मेसेजद्वारे कळवल्याचे ममता यांनी सांगितले. नंदीग्रामच्या मतमोजणीबाबत शंका व्यक्त करताना तिथे चार तास सर्व्हर डाऊन होता, ही माहिती त्यांनी दिली. याच काळात राज्यपालांनी आपल्याला फोन करुन विजयाबद्दल अभिनंदनही केले होते. मात्र, त्यानंतंर अचानक सर्व काही बदलले असेही ममता यांनी सांगितले.

    राज्यात हिंसाचार घडू नये यासाठी शांततेचं आवाहनही ममता यांनी केले. भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांनी आपल्याला खूप त्रास दिला आहे हे मला माहित आहे. पण सध्या आपले सारे लक्ष हे कोरोना महामारीचा मुकाबला करण्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने २० हजार कोटी रुपये तातडीने जारी करावेत, ज्यामुळे संपूर्म देशभरात लसीकरणाला गती येईल, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकार केवळ दोन ते तीन राज्यांनाच जास्त लशी आणि ऑक्सिजन देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

    तृणमूल काँग्रेस कोणत्याही हिसेंचा निषेधच करते, मात्र जुन्या दंगलींचे फोटो व्हायरल करुन भाजपा आपली, पक्षाची बदनामी करत असल्याचा आरोप ममता यांनी केला. ही भाजपाची सवय असल्याचे त्यांनी म्हटले. बहुमताने विजय मिळवल्यानंतंरही पक्षाने कोणताही विजयोत्सव साजरा केला नाही, आपण सर्वजण मिळून भाजपाशी लढू शकतो. आपण रस्त्यांवर संघर्ष करु शकतो आणि नेतृत्वक्षमताही आपल्याकडे असल्याचे ममता यांनी यावेळी सांगितले. २०२४ च्या निवडणुकांत सर्व जण मिळून भाजपाचा पराभव करु शकतो, असेही ममता म्हणाल्या.

    प. बंगालमध्ये झालेल्या २९२ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत तृणमूलला २१४ जागा मिळाल्या आहेत. नंदीग्राममधून ममतांचा पराभव झाला असला, तरी ५ मे रोजी त्या प. बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.