थोड्याच वेळात ममता बॅनर्जी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, या मान्यवरांना आहे निमंत्रण

शपथविधीसाठी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आलीय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही ठराविक मान्यवरांनाच या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलंय. शपथविधीचा हा कार्यक्रम ५५ मिनिटांचा असणार आहे.

    पश्चिम बंगाल विधानसभेत तिसऱ्यांदा बहुमत मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बंगालमध्ये भाजपसोबत झालेल्या चुरशीच्या लढतीत तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवत निर्विवाद बहुमत प्राप्त केलं. बंगालच्या विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

    शपथविधीसाठी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आलीय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही ठराविक मान्यवरांनाच या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलंय. शपथविधीचा हा कार्यक्रम ५५ मिनिटांचा असणार आहे. सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी ममता बॅनर्जी काली घाट या आपल्या निवासस्थानातून शपथविधीसाठी रवाना होणार आहेत.

    शपथविधीच्या या कार्यक्रमाला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी, ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी, राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना आमंत्रित करण्यात आलंय. याशिवाय ममता बॅनर्जींसोबत त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर हेदेखील उपस्थित असणार आहेत. शपथविधीनंतर ममता बॅनर्जी या थेट नवन्नासाठी रवाना होणार असून तिथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे.

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत २९२ पैकी २१३ जागा जिंकत तृणमूल काँग्रेसनं मोठं यश संपादित केलंय. स्वतः ममता बॅनर्जी मात्र पराभूत झाल्या असल्या तरी पुढच्या  सहा महिन्यांत इतर मतदारसंघातून निवडून येण्याचं आव्हान त्यांच्यापुढं असणार आहे.