जो डर गया वो मर गया, ‘शोले’तला डायलॉग मारत ममता बॅनर्जींचं बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांना आवाहन, मोदी सरकारला टक्कर देण्याचा इशारा

जो डर गया, वो मर गया, या शोले चित्रपटातील डायलॉगची आठवण करून देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. मोदी सरकार हे अनेक बाबतीत अपयशी ठरलं असून त्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी वाट्टेल त्या मुद्द्यांना हवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केलाय. 

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष अधिक कडवा होत चालल्याचं गेल्या काही दिवसांतील घटनांमधून दिसून येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपासून वाढत गेलेला हा संघर्ष अद्यापही सुरूच असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताचं शोले चित्रपटातील डायलॉग वापरत मोदी सरकारविरुद्ध दंड थोपटले आहेत.

    जो डर गया, वो मर गया, या शोले चित्रपटातील डायलॉगची आठवण करून देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. मोदी सरकार हे अनेक बाबतीत अपयशी ठरलं असून त्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी वाट्टेल त्या मुद्द्यांना हवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केलाय.

    केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संबंधांमध्ये नेहमीच एक सीमारेषा असणं गरजेचं आहे. ही सीमारेषा आजवर नेहमीच जपली गेलीय. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही केंद्र आणि राज्य संबंधांवर बारकाईनं  विचार करून धोरणं ठरवली होती. मात्र सध्याचं मोदी सरकार या मर्यादांचं उल्लंघन करत असून त्याविरुद्ध सर्व राज्यांनी आवाज उठवणं गरजेचं असल्याचं मत ममता बॅनर्जींनी व्यक्त केलंय.

    वारंवार वेगवेगळी पत्रं आणि नोटिसा पाठवून केंद्राकडून राज्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. दुसरीकडे नोकरशाहीच्या माध्यमातूनही दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पान बंडोपाध्याय नुकतेच त्यांच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारनं ऑफर केलेलं पद घ्यायला नकार दिला. त्या पार्श्वभूमीवर नोकरशाहीवर असलेल्या दबावाचा मुद्दा ममता बॅनर्जींनी उचलून धरलाय. ममता बॅनर्जींच्या या आवाहनाला आता इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिसाद मिळतो आणि केंद्र सरकार काय प्रत्युत्तर देतं, याची उत्सुकता आहे.