त्याचा मृत्यू झालाय असं समजून कुटुंबियांनी उरकले अंत्यसंस्कार, दहा दिवसांनी तो घरी आल्यावर घरच्यांना बसला धक्का

एका कुटुंबाने परिवारातील व्यक्तीचा मृत्यू(Death) झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले. आश्चर्याची बाब म्हणजे अंत्यसंस्कार केल्यानंतर आठवड्याभराने ती व्यक्ती घरी पुन्हा परतली.

    राजस्थानमधील(Rajasthan) राजसमंद एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे एका कुटुंबाने परिवारातील व्यक्तीचा मृत्यू(Death) झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले. आश्चर्याची बाब म्हणजे अंत्यसंस्कार केल्यानंतर आठवड्याभराने ती व्यक्ती घरी पुन्हा परतली तेव्हा घरच्यांचं काय झालं असेल याचा विचार तुम्ही करुच शकता.

    राजस्थानमधील आरके रुग्णालयाने उपचार घेत असलेल्या गोवर्धन प्रजापत नावाच्या व्यक्तीचा मृतदेह अज्ञात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रुग्णालयाने तो ओमकारलाल गाडोलिया या व्यक्तीचा मृतदेह असल्याचे सांगत नातेवाईकांनी दिला. त्यानंतर गाडोलियाच्या कुटुंबियांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र १० दिवसांनी ओमकारलाल घरी आला. त्याने दिलेल्या माहितीनंतर हा सगळा प्रकार समोर आला.

    ओमकारलाल ११ मे रोजी आपल्या कुटूंबाला न सांगता उदयपूरला गेला होता. यकृताच्या आजारामुळे तो तिथे उपचार घेत होता. लॉकडाऊन लागल्यानंतर ओमकारलालचे कुटुंब त्याच्या भावाच्या घरी राहत होते. त्याच दिवशी काही लोकांनी गोवर्धन प्रजापतला आरके रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

    “आम्हाला रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळालं . त्यामध्ये तीन दिवसांपासून शवगृहात एक मृतदेह बेवारस पडलेला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी विविध ठिकाणी मृत व्यक्तीचा फोटो पाठवण्यात आला.अनेक लोक मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी येऊन गेले.  एका कुटुंबाने ओळख पटवली होती. त्यांनी शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात देण्यासाठी लेखी पत्र दिले. ओमकारलाल गाडोलिया याच्या उजव्या आणि डाव्या हातावर जखम असल्याचे त्यांनी सारखाच वाटणारा गोवर्धनचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी शवविच्छेदन व डीएनए चाचणी न करता मृतदेह ताब्यात दिला. तो मृतदेह त्या कुटुंबाने ओळखला. डीनए चाचणी ही जर मृतदेह बेवारस असेल तर करण्यात येते त्यामुळे असे करण्यात आले,”कांकरोली पोलीस स्टेशनचे अधिकारी योगेंद्र व्यास यांनी सांगितले.

    गाडोलिया कुटुंबाने त्या मृतदेहावर १५ मे रोजी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर२३ मे रोजी ओमकारलाल घरी परत आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्याला धक्का बसला. त्यानंतर पोलिसांना तपास सुरू केला आणि कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केलेला मृतदेहाबद्दल माहिती मिळवली.