हुतात्मा जवानाच्या गर्भवती पत्नीने व्हिडिओ कॉलच्या मार्फत घेतले अंत्यदर्शन!

सियाचीन बॉर्डरवर तैनात असलेल्या जवानाचा बर्फाच्या दरीत पडून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे गर्भवती पत्नीला आपल्या हुतात्मा पतीचे प्रत्यक्ष अंत्यदर्शन घेता आले नाही.

सोलन: सियाचीनच्या सीमेवर आपल्या चौकीचे संरक्षण करताना पाय घसरुन बर्फाच्या दरीत कोसळल्याने एक जवान शहीद झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. दुर्दैवाने हुतात्मा झालेल्या जवानाच्या पत्नीला अखेरचे दर्शनही व्हिडिओ कॉलवरून घ्यावे लागले आहे. हुतात्मा झालेल्या जवानांची पत्नी दीपा आठ महिन्याच्या गरोदर आहेत.

हिमाचल प्रदेशातील सोलन (Solan) जिल्ह्यातील जवानाच्या कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. सोलन जिल्ह्यातले बिजलंग गुरुंग हे जवान सियाचीनच्या बॉर्डवर तैनात होते. चौकीवर पहारा देत असताना ते अचानक बर्फाच्या दरीत कोसळले. त्यांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात शोधकार्य राबवण्यात आले , मात्र गुरुंग त्यांना वाचवण्यात शोधपथक अपयशी ठरले. बर्फाच्या ढिगाऱ्याखालून गुरुंग यांना बाहेर काढण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

गुरुंग यांच्या पत्नी दीपा या आठ महिन्यांच्या गर्भवती असून त्या सध्या कुटुंबीयांसोबत नेपाळमध्ये आहेत. मंगळवारी गुरुंग यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या पतीचं व्हिडिओ कॉलच्या मार्फत अंत्यदर्शन घेतलं. गुरुंग दोन महिन्यांपूर्वी सुट्टी घेऊन त्यांच्या पत्नीला भेटायला नेपाळमध्ये गेले होते. त्या पती-पत्नींची ती शेवटची भेट ठरली.

हुतात्मा जवान बिजलंग गुरुंग यांच्या घरात देशसेवेची मोठी परंपरा आहे. त्यांचे वडील गुरुंगयांच्याच युनिटमधून निवृत्त झाले असून आता डीएसआयच्या मार्फत देशसेवा करत आहेत. तर त्यांचे भाऊ जम्मूच्या सीमेवर तैनात आहेत