कर्नाटकमध्ये जिलेटिन काड्यांचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू , तर एक जखमी

कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यात बेकायदेशीर जिलेटिनचा साठा केला होता. परंतु आपल्यावर पोलीस कारवाई होऊ शकते या भीतीने त्यांनी जिलेटिनच्या काड्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे करत असतानाच हा भीषण स्फोट झाला आहे. यामुळे सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.

    कर्नाटकमधील चिक्काबल्लापूर गावात जिलेटिन काड्यांचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दु:ख व्यक्त केले आहे. तसेच खोदकाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन काड्यांची विल्हेवाट लावताना हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यात बेकायदेशीर जिलेटिनचा साठा केला होता. परंतु आपल्यावर पोलीस कारवाई होऊ शकते या भीतीने त्यांनी जिलेटिनच्या काड्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे करत असतानाच हा भीषण स्फोट झाला आहे. यामुळे सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.

    या घटनेनंतर चिक्काबल्लापूरचे जिल्हा प्रभारी डॉ. के. सुधाकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करत बेकायदेशीरपणे जिलेटिनचा साठा करुन ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत. यावेळी ट्विटवरून बी. एस. येडियुरप्पा यांनी जिलेटिनच्या स्फोटांमुळे चिक्काबल्लापूर गावात हिरेनागावल्ली गावाजवळ सहा जणांचा मृत्यू झाला असून ही धक्कादायक बाब आहे. जिल्हा प्रभारी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.