monsoon temple kanpur

  कानपूर : आपला भारत देश हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. याठिकाणी आपल्या भक्ती आणि आस्थेची प्रतीके असलेली असंख्य अशी सुंदर मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे वेगळे महत्त्व आणि वेगळी अख्यायिका. उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक असे मंदिर आहे, जे मान्सूनची अत्यंत अचूक अशी माहिती देते. भारतीय पुरातत्त्व विभागाने जतन केलेल्या वारसास्थळांमध्ये समावेश असलेले हे मंदिर शास्त्रज्ञांसाठीही गूढ ठरले आहे.

  मंदिरात जगन्नाथाची मूर्ती

  कानपूरपासून अंदाजे 50 किलोमीटर दूर असलेल्या या मंदिराला मान्सून मंदिर म्हणूनही ओळखतात. या मंदिरात भगवान जगन्नाथाची मूर्ती आहे तर मंदिराच्या छतावर मान्सून दगड आहे. या दगडावरून खाली पडणाऱ्या थेंबांवरून पाऊस किती याचा अंदाज लावला जातो. जर जास्त थेंब पडले तर जास्त पाऊस होण्याची शक्यता असते. ही केवळ मान्यता नसून यात विज्ञानही आहे. मंदिर तयार करताना याची काळजी घेण्यात आली आहे. मंदिराच्या भिंती आणि छत तशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे मान्सून सुरू होण्याच्या 5-7 दिवसांपूर्वीच इथे संकेत मिळतो.

  4200 वर्षांचा इतिहास

  हे मंदिर अनेकदा तोडण्यात आले आणि पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. जेव्हा देशामध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर होता, तेव्हाच्या स्थापत्य कलेचा प्रभावही मंदिरात आहे. मंदिराच्या दगडांच्या कार्बन डेटिंगमुळे ते 4200 वर्षे जुने असल्याचे समजते. मंदिर तीन भागांत तयार केलेले आहे. गर्भगृहाचा लहान भाग, नंतर मोठा भाग आहे. हे वेगवेगळ्या काळात तयार केले आहेत. इथे विष्णूची मूर्ती स्थापित आहे. विष्णूच्या 24 अवतारांच्या आणि पद्मनाभ स्वामींची मूर्ती आहे.

  संशोधनासाठी येतात शास्त्रज्ञ

  मंदिराला मान्सूनच्या भविष्यवाणीसाठी ओळखले जाते. तसेच शिखरावरील सूर्यचक्राचेही महत्त्व सांगितले जाते. या सूर्यचक्रामुळे कधीच मंदिरावर वीज पडत नाही, असे म्हटले जाते. मंदिर रथाच्या आकारातील आहे. लांबून भाविक इथे येतात. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्याच्या मते याठिकाणी शास्त्रज्ञ नेहमी येत जात असतात. पण त्यांना फार काही माहिती मिळालेली नाही. सध्या हे मंदिर सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एक तासच उघडे असते.

  हे सुद्धा वाचा