मिथुनदा भाजपाच्या बाजूने मैदानात, मोदींच्या सभेला उपस्थित राहणार का? बंगालच्या सत्तेवरून तृणमूल काँग्रेसला दूर करण्याचा विडा

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या मोदींच्या सभेकडे भाजपचा पहिला मोठा प्रचार कार्यक्रम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्या सभेला भव्य स्वरूप देण्याची तयारी बंगाल भाजपने चालवली आहे. काही नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे मोदींची सभा चकित करणारी ठरेल, असे भाजपच्या सुत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे.

    कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांना वारे वाहू लागले आहेत. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा औपचारिक नारळ आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील सभेत फोडतील. त्या सभेत ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

    निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या मोदींच्या सभेकडे भाजपचा पहिला मोठा प्रचार कार्यक्रम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्या सभेला भव्य स्वरूप देण्याची तयारी बंगाल भाजपने चालवली आहे. काही नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे मोदींची सभा चकित करणारी ठरेल, असे भाजपच्या सुत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे.

    मिथुनदा सभेला उपस्थित राहतील, अशा अटकळी काही दिवसांपासून सुरू आहेत. तृणमूल कॉंग्रेसला बंगालच्या सत्तेवरून दूर करण्याचा विडा उचलणाऱ्या भाजपने मतदारांना खेचण्यासाठी अनेक फिल्मी चेहऱ्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे मिथुनदा खरोखरीच सभेला उपस्थित राहणार का आणि भाजपमध्ये डेरेदाखल होणार का, याविषयीचे कुतूहल वाढले आहे.