एकही लस न घेणाऱ्या आमदाराचे कोरोनामुळे निधन; मेघालय विधानसभेत खळबळ

दोन डोस घेणाऱ्यांवर कोरोनाचा घातक परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. लस न घेतलेल्या अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. अशातच, कोरोना प्रतिबंधित लशीची एकही मात्रा न घेणाऱ्या मेघालयच्या अपक्ष आमदाराचे निधन झाले आहे.

    शिलाँग (Shillong). भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूवर (the corona virus) तूर्त प्रतिबंधीत लस हाच एकमेव रामबाण उपाय आहे. लसीचे एक किंवा दोन डोस घेणाऱ्यांवर कोरोनाचा घातक परिणाम (harmful effects of Corona) होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. लस न घेतलेल्या अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. अशातच, कोरोना प्रतिबंधित लशीची एकही मात्रा न घेणाऱ्या मेघालयच्या अपक्ष आमदाराचे (MLA from Meghalaya) निधन झाले आहे.

    आमदार सिंटार क्लास सुन यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सिंटार यांची कोरोनामुळे तब्येत खालावत चालली होती. मावंगपमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला. विधानसभेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिंटार यांनी एकही कोरोनाची लस घेतली नव्हती. राज्यात असे सात आमदार आहेत, ज्यांनी अद्याप एकही लस घेतलेली नाही. सिंटार हे विधानसभेतील पर्यावरण समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू यूजीनसन लिंगदोहचे वडील होते.

    2016 मध्ये ते राज्याच्या पीएचईतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 2018 मध्ये ते मावफलांग मतारसंघातून विधानसभेवर गेले होते. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सिंटार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मेघालय विधानसभेच्या 5 आमदारांचे 2018 पासून निधन झाले आहे. 2018 मध्ये काँग्रेस आमदार क्लेमेंट मारक, 2019 मध्ये अध्यक्ष डोनकुपर रॉय, डेविड ए नोंग्रुम यांचे यंदा 2 फेब्रुवारी आणि डॉ आजाद जमान यांचे 4 मार्चला निधन झाले होते.