श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद, हल्ला करून बसले लपून, शोधमोहिम सुरू

जम्मू काश्मीरमध्ये गस्त घालणाऱ्या पोलीस आणि एसआरपीएफ (SRPF) च्या संयुक्त पथकावर काही दहशतवाद्यांनी अचानक छुपा हल्ला चढवला. श्रीनगरमधील सझगरीपुरा परिसरात हे जवान कर्तव्य बजावत असताना अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी उच्छाद मांडलाय. गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार छोट्या मोठ्या दहशतवादी कारवाया घडत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये गस्त घालणाऱ्या पोलीस आणि एसआरपीएफ (SRPF) च्या संयुक्त पथकावर काही दहशतवाद्यांनी अचानक छुपा हल्ला चढवला. श्रीनगरमधील सझगरीपुरा परिसरात हे जवान कर्तव्य बजावत असताना अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला चढवला.

या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. हल्ला चढवल्यानंतर हे दहशतवादी तिथून पळून गेले आणि लपून बसले. सीआरपीएफ आणि पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवादी तिथून पसार झालेत.

हे दहशतवादी याच परिसरात लपले असल्याची माहिती आहे. काही स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दहशतवाद्यांना पकडून लवकरात लवकर या परिसरातील धोका नष्ट करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान जंग जंग पछाडत आहेत.

काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये एक भूमिगत बोगदा सीआरपीएफच्या जवानांनी शोधला होता. या बोगद्यातून पाकिस्तानातील घुसखोर आणि दहशतवादी भारतात येत असल्याचं स्पष्ट झालं होतं. हा बोगदा बुजवण्यातही आला होता. मात्र अन्य छुप्या मार्गांनी पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरुच ठेवल्याचं या घटनेतून स्पष्ट होतंय.