Model of India-Japan friendship; 108 Rudraksha Convention Center in Varanasi in collaboration with Japan

  वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात जपान व भारताच्या मैत्रीचा उत्तम नमुना रुद्राक्ष कन्वेंशन सेंटर तयार झाले आहे. यासाठी जपानने 186 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे. यात जपानी व भारतीय वास्तुशैलींचा संगम आहे. या प्रकल्पाची पायाभरणी डिसेंबर 2015 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे भारत दौऱ्यावर आल असताना करण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी भारताला बुलेट ट्रेनची भेट दिली, तर वाराणसीत जपानच्या सहकार्याने रुद्राक्ष नावाच्या आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राचे गिफ्टदेखील दिले.

  1200 प्रेक्षकांची क्षमता

  रुद्राक्ष बनल्यामुळे शहरात सांस्कृतिक व प्रवासी भारतीय दिवसासारख्या जागतिक आयोजनासाठी जागा कमी पडणार नाही. याशिवाय प्रदर्शन व मेळ्यासोबत पर्यटन व व्यवसायासंबंधीचे सरकारी आयोजनही येथे सहजतेने होऊ शकणार आहे. या केंद्रात एकावेळी 1200 लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. लोकांच्या संख्येनुसार हे केंद्र दोन भागात विभागण्याचीही सुविधा येथे करण्यात आली आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या मोठ्या हॉलबरोबरच 150 लोकांची क्षमता असलेला बैठक कक्षही येथे बनविण्यात आला आहे. याशिवाय एक व्हीआयपी कक्ष व चार ग्रीन रूम तयार करण्यात आल्या आहेत.

  असे आहे केंद्र

  या सांस्कृतिक केंद्रात 108 रुद्राक्ष लावण्यात आले आहेत व छत शिवलिंगाच्या आकाराचे तयार करण्यात आले आहे. दोन मजली हे केंद्र सिंगरा क्षेत्रात 2.87 हेक्टर जमिनीवर विस्तारले आहे. रुद्राक्ष केंद्राचा उद्देश लोकांना सामाजिक व सांस्कृतिक संवादाच्या संधी प्रदान करणे आहे. येथे आंतरराष्ट्रीय संमेलन, प्रदर्शन, संगीत समारोह व अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ शकतात. हे केंद्र वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्सने सजविण्यात आले आहे.

  केंद्र बनणार वाराणसीची नवी ओळख

  पंतप्रधान मोदी यांनी रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरचे उद्घाटन करताना सांगितले की, कोरोनाकाळात जेव्हा जग थांबले होते, तेव्हा वाराणसी संयमित तर झाली पण शिस्तशीरदेखील झाली. परंतु सृजन व विकासाची धारा अव्याहतपणे वाहत राहिली. काशीच्या विकासाचे आयाम, रचनात्मकता व गतीशीलतेचा परिणाम आहे हे रुद्राक्ष केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले.