पंतप्रधानांचे राजकारण अब्जोपती मित्रांसाठीच : प्रियंका गांधी

दिल्लीत शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला, त्यांना देशद्रोही आणि आंदोलनजीवी संबोधण्यात आले असा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायतला संबोधित करताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभ्रमंती केली परंतु लाखो शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यात मात्र त्यांना अपयश आले.

  मुजफ्फरनगर (Muzaffarnagar).  दिल्लीत शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला, त्यांना देशद्रोही आणि आंदोलनजीवी संबोधण्यात आले असा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायतला संबोधित करताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभ्रमंती केली परंतु लाखो शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यात मात्र त्यांना अपयश आले. त्यांचे राजकारण केवळ अब्जोपती मित्रांसाठीच आहे, असा घणाघाती हल्ला प्रियंका गांधी चढविला.

  येथे येऊन मी कोणावर उपकार करत नाही. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. त्यांना परजीवी आणि आंदोलनजीवी म्हटले आहे. राकेश टिकैत यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात तेव्हा पंतप्रधानांच्या ओठांवर हसू उमटते. जगभ्रमंतीसाठी पंतप्रधानांनी 16 हजार कोटींची दोन विमाने खरेदी केली परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. संसद भवन, इंडिया गेटच्या सौंदर्यीकरणासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली जात आहे आणि ऊसाची थकबाकी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत.— प्रियंका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

  पंतप्रधान अहंकारी
  प्राचीन कथांचा दाखला देत पूर्वीच्या काळी राजेमहाराजे अहंकारी असत. तीच स्थिती पंतप्रधान मोदींचीही झाली आहे असे प्रियांका म्हणाल्या. दोन वेळा पंतप्रधान झाल्यामुळे त्यांच्यात अहंकार उत्पन्न झाला आहे. त्यांच्यासमोर सत्य कथन करण्यास लोकंही घाबरू लागले आहेत. त्यामुळेच त्यांचा अहंकार वाढला असल्याची टीका त्यांनी केली. जो जवान या देशाच्या सीमांचे रक्षण करतो तो शेतकरीपुत्र आहे याचेही भान पंतप्रधानांना नाही, अशी टीका प्रियांकांनी केली.

  नव्या कायद्याने एमएसपी संपणार
  नव्या कृषी कायद्यांमुळे सरकारी बाजार बंद होतील आणि मोठ्या उद्योगपतींचाच फायदा होईल आणि एमएसपीही संपुष्टात येईल, असे प्रियांका म्हणाल्या. देशात गॅस, वीज आणि पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी आंदोलनात 215 शेतकरी शहीद झाले; परंतु सरकारला पर्वाच नाही असा घणाघातही त्यांनी केला.