mysterious disease in Andhra Pradesh; Not one but 200 people were admitted to the hospital at the same time

एलुरु :  आंध्र प्रदेशच्या एलुरू गावात एका अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. गावातील वेगवेगळ्या भागातून या अज्ञात आजारामुळे 200 हून अधिक लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील या गावातील रुग्णांना भोवळ येणे, डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.

धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णांमध्ये मिरगीसदृश लक्षणेही दिसून आली. यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. शनिवारी रात्री या आजाराने ५५ ग्रामस्थांना ग्रासले होते. मात्र, रविवारी सकाळी रुग्णसंख्या १७० वर पोहचली आणि दुपारी २०० पेक्षा अधिक रुग्णांना हे त्रास जाणवू लागले.

यापौकी ४६ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ७० रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, अतिगंभीर अशा पाच रुग्णांवर विजवाडाच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एलुरू वेस्ट स्ट्रीट, एलुरू साऊथ स्ट्रीट, कोट्टापेटा, शनिवारपुपेटा आणि आदिवारपुपेटा या भागांमधील लोकांना ही बाधा झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना भोवळ येण्यासोबतच, डोकेदुखी आणि उलटी येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. उपचारांनंतर या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून येत असल्याचे सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.

आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशी आदेश

अज्ञात आजारामुळे २०० पेक्षा अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळताच राज्याच्या आरोग्यमंत्री अल्ला नानी यांनी एलुरूमधील परिस्थितीचा आढावा घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी असे रुग्ण आढळून येत आहेत त्या ठिकाणी वैद्यकीय कॅम्प उभारण्यात येत आहेत. तसेच, गावातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री नानी यांनी दिली.