new kolhapur airport development extension of runway
नव्या वर्षात कोल्हापुरात मोठी विमाने उतरणार! धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू

विमानतळावरील धावपट्ट्यांची लांबी वाढविण्यात येणार असून त्यात कोल्हापूरसह जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश (जबलपूर), मेघालय (बारापानी), आंध्र प्रदेश (तिरुपती व काडापा) तसेच तामिळनाडू (तुतीकोरीन) आदी विमानतळांचा समावेश असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई प्राधिकरणाने (Airport Authority of India) देशातील सात विमानतळांच्या (airports) धावपट्ट्यांना (runway) मार्च २०२२ पर्यंत अद्ययावत करून त्यांची लांबी वाढविण्याचा (extension of lenth) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात कोल्हापूरसह जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश (जबलपूर), मेघालय (बारापानी), आंध्र प्रदेश (तिरुपती व काडापा) तसेच तामिळनाडू (तुतीकोरीन) आदी विमानतळांचा समावेश असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

कोल्हापूर येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १३७० मीटर असून ती २३०० मीटरपर्यंत वाढविण्याचे सुरू झाले असून यंदाच्या डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याची योजन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विमानतळाची रचना विशेष प्रकाराच्या विमानांचा आकार तसेच विमानांचे ट्रफिक आणि इतर बाबींचा विचार करून केलेली असते. जेव्हा एअर ट्रफिक वाढून विमानांची संख्या वाढते तेव्हा एअरलाईन कंपन्यांना मोठी विमाने त्या विमानतळावरून सुरू करायची असतात. याच कारणांसाठी विमानांच्या धावपट्ट्यांची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरात मोठी विमाने उतरविणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे.

देशातील सात विमानतळांच्या धावपट्ट्यांचा विकास Extension Of Runway

जम्मू येथील विमानतळाची धावपट्टी २०४२ मीटरवरून २४३८ मीटर इतकी वाढविण्यात येणार असून नव्या वर्षांत मार्चपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. तिरुपतीच्या धावपट्टीची लांबी डिसेंबर २०२१ पर्यंत २२८६ मीटरवरून ३८१० मीटर्स इतकी करण्यात येईल. जबलपूर आणि तुतीकोरीन विमानतळांच्या धावपट्टीचे काम अनुक्रमे डिसेंबर २०२१ आणि मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल. बारापानी विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचे काम यंदाच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. काडापाच्या धावपट्टीचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होईल असेही अधिकाऱ्यांनी शेवटी सांगितले.