उत्तर प्रदेशात नवा भाडेकरू कायदा, यापुढे एवढीच भाडेवाढ होणार; भाडं दिलं नाही तर मात्र….

सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार दरवर्षी घरभाड्यात १० टक्के वाढ केली जाते. मात्र आता नव्या नियमानुसार दरवर्षी ५ टक्के दरवाढ करायला परवानगी असेल. तर व्यावसायिक ठिकाणांसाठी जास्तीत जास्त ७ टक्के भाडेवाढ करता येणार आहे. नव्या कायद्यानुसार जर सलग दोन महिने भाडेकरूनं घराचं भाडं भरलं नाही, तर घरमालकाला त्याला हाकलून देण्याचा अधिकार मिळणार आहे. भाडेकरूनं त्या घराचं काही नुकसान केलं, तर ते भरून देणं भाडेकरूवर बंधनकारक असेल.

उत्तर प्रदेश सरकारने भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील कराराबाबतच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय. सध्याच्या कायद्यातील काही बाबी संदिग्ध असल्यामुळे त्यात अधिक स्पष्टता आणण्याच्या दृष्टीने हा नवा कायदा तयार होत असल्याचं सांगितलं जातंय.

सध्याच्या कायद्यांमध्ये घरमालकाच्या सुरक्षेचा अधिक विचार केलेला आहे. मात्र तेवढंच संरक्षण भाडेकरूंना मिळणंदेखील गरजेचं आहे. या बाबींचा विचार नव्या कायद्यात केला जाणार आहे. भाडेकरू आणि घरमालक या दोघांनाही सुरक्षा मिळावी आणि त्यांच्यातील व्यवहार अधिकाधिक पारदर्शक व्हावेत, यासाठी या कायद्यात काही तरतुदी करण्यात येणार आहेत.

सध्याच्या कायद्यातील अनेक संदिग्ध तरतुदींमुळे घरमालक आणि भाडेकरूंमध्ये वाद होतात. अशा तरतुदी सुधारून त्यात काही नवे नियम समाविष्ट केले जाणार आहेत. हे सर्व व्यवहार आता सरकारकडे नोंदवले जाण्याची पद्धतदेखील सुधारणार असल्यामुळे प्रत्येक गाव आणि शहरात कुणाचे घर कुणाला भाड्याने दिले आहे, याचे सर्व तपशील प्रशासनाकडे उपलब्ध असतील.

या विधेयकाबाबत नागरिकांनी त्यांची मतं आणि सूचना द्यावात, असं आवाहन सरकारनं केलं आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वेबसाईटवर या विधेयकाची कॉपी अपलोड करण्यात आली असून २० डिसेंबरपर्यंत नागरिकांना त्याबाबत आपली मतं नोंदवता येणार आहेत. या कायद्यात एक भाडे प्राधिकरण स्थापित केलं जाणार आहे.

भाडेकरूंना दिलासा