बिगर हिंदूंना देवीच्या मंडपात येण्यास बंदी; विश्व हिंदू परिषदेचे फर्मान

विहिंपच्या या फर्मानामुळे शहरातील पोलिसही सतर्क झाले आहेत. पोलिसांच्या गुप्तचर विभागाने या प्रकरणी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पूजा पंडालवर पोलिसांकडून सुरक्षेशी संबंधित व्यवस्थाही केली जात आहे.

    भोपाळ (Bhopal) : नवरात्रोत्सवा दरम्यान दुर्गा पूजा पंडालसह अनेक धार्मिक कार्यक्रमात बिगर हिंदूंच्या प्रवेशावर विश्व हिंदू परिषदेने (The Vishwa Hindu Parishad) (विहिंप) (VHP) बंदी घातली आहे. मध्यप्रदेशातील रतलाममध्ये विहिंपच्या वतीने संपूर्ण शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत. पूजा पंडालमध्ये (Durga Puja Pandal) बिगर हिंदूंच्या (Non-Hindus) प्रवेशावर बंदी आहे, अशी सूचना या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, बिगर हिंदू लोक हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा आणि पूजा करण्याच्या पद्धतीचे पालन करत नाहीत, म्हणून त्यांनी पंडालमध्ये येऊ नये.

    गेल्या काही वर्षांपासून पंडालमध्ये बिगर हिंदू तरुणांकडून समाजविघातक कृत्य केले जात आहेत. म्हणून, असे पोस्टर्स लावून बिगर हिंदू लोकांना न येण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, असे विहिंपचे म्हणणे आहे.

    पोलिस विभाग सतर्क
    विहिंपच्या या फर्मानामुळे शहरातील पोलिसही सतर्क झाले आहेत. पोलिसांच्या गुप्तचर विभागाने या प्रकरणी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पूजा पंडालवर पोलिसांकडून सुरक्षेशी संबंधित व्यवस्थाही केली जात आहे. आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. आमच्याकडे तक्रार असल्यास आम्ही कारवाई करू, असे रतलाम प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, दुसरीकडे गाझियाबादचे डासना मंदिर पुन्हा चर्चेत आहे.

    दासना मंदिर महंत यती नरसिम्हानंद सरस्वती यांनी मंदिरात चुकून घुसलेल्या 10 वर्षांच्या मुलाला गाझियाबाद पोलिसांच्या हवाली केले आहे. महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनीही यासंदर्भातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. ज्यात त्यांनी मुलावर मंदिरावर हेरगिरी केल्याचा आरोप केला आणि आम्ही मुलाला पोलिसांच्या हवाली केले असल्याचेही सांगितलं.