अस्थिरता संपली, गेहलोत सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

राजस्थानमधील अस्थिरतेचे वादळ सध्यापुरते तरी शमले आहे. कारण राजस्थानमधील गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आज विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान घेण्यात आलं. विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय गेहलोत यांच्या सरकारने घेतला होता. त्यानुसार हा ठराव मांडण्यात आला आणि गेहलोत सरकारने हा ठराव जिंकला.

सचिन पायलट यांच्या बंडामुळे राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अडचणीत आले होते. मात्र आता विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने राजस्थानमध्ये गेहलोत सरकारवरचे संकट टळले आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकलो आहोत, अशी प्रतिक्रिया सचिन पायलट यांनी दिली आहे. विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही आमच्या बाजूने निर्णय लागला असल्याचे पायलट म्हणाले. गुरुवारी गेहलोत आणि पायलट यांची भेट झाली तेव्हाच दोघांच्या समेटीची चिन्हे दिसू लागली होती. आता विश्वासदर्शक ठरावाच्या निकालानंतर पायलट आणि गेहलोत एकत्र आल्याचे स्पष्ट झाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जे झाल त्याची चिंता करायला हवी. देशभर लोकशाहीची खिल्ली उडवली जात असल्याचे दिसत आहे. अमित शाह निवडून आलेली सरकारं पाडण्याची स्वप्न पाहत असतात. मात्र आम्ही हे सरकार पडू देणार नाही , असा निर्धार गेहलोत यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप नेत्यांनी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर सचिन पायलट म्हणाले की, विरोधकांनी आमच्यामधल्या मतभेदांमध्ये पडू नये. विश्वासदर्शक ठरावावर लक्ष द्यावे. दरम्यान २१ ऑगस्टपर्यंत विधानसभा अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.