ओडिशात आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न, सांगितले हे कारण

ओडिशामध्ये लाखो शेतकरी तांदळाचं उत्पादन करतात. मात्र या तांदळाला भाव नसल्यामुळे आणि सरकार खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. २ लाख क्विंटलपेक्षा अधिक तांदूळ पडून आहेत. तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवूनही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे व्यथित होऊन आपण आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुभाषचंद्र पाणीग्राही यांनी दिलीय. 

    ओडिशामध्ये आमदाराने भर विधानसभेत सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली. विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच या आमदाराने सर्वांसमोर सॅनिटायझर प्यायलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तातडीनं त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आपल्या या कृत्यामागचं कारण त्यांनी त्यानंतर स्पष्ट केलंय.

    ओडिशामध्ये लाखो शेतकरी तांदळाचं उत्पादन करतात. मात्र या तांदळाला भाव नसल्यामुळे आणि सरकार खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. २ लाख क्विंटलपेक्षा अधिक तांदूळ पडून आहेत. तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवूनही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे व्यथित होऊन आपण आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुभाषचंद्र पाणीग्राही यांनी दिलीय.

    ओडिशाच्या देवगड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे पाणीग्राही हे गेल्या काही दिवसांपासून तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत. अन्नपुरवठा मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत तांदूळ खरेदीच्या प्रश्नावर उत्तर देत होते. हे उत्तर सुरू असतानाच आमदार पाणीग्राही यांनी सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

    टोकन सिस्टम आणि तांदूळ खरेदीचे व्यवस्थापन यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप पाणीग्राही यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना सरकारचं त्याकडं लक्ष नसून प्रशासन गेंड्याच्या कातडीचं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही, तर आत्महत्या करू असा इशारा त्यांनी अगोदरच दिला होता. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी या मुद्द्यावरून आंदोलनदेखील केलं होतं.