धक्कादायक घटना! आर्थिक चणचणीला कंटाळून संपवलं आयुष्य ; पत्नीसह मुलांचीही निर्घृण हत्या

भोपाळमधल्या मिसरोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (२८ ऑगस्ट) रोजी ही घटना उघडकीस आली आहे. एका इंजिनीअरने आपल्या दोन तरुण मुलांना संपवण्याचा प्रयत्न करून स्वतःनेही पत्नीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  भोपाळ: मागील दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. या काळात अनेक जणांचा बळी गेला आहे. तर काही लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. या कारणामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आर्थिक चणचणीला कंटाळून एका इंजिनीअरने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधल्या मिसरोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (२८ ऑगस्ट) रोजी ही घटना उघडकीस आली आहे. एका इंजिनीअरने आपल्या दोन तरुण मुलांना संपवण्याचा प्रयत्न करून स्वतःनेही पत्नीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या कुटुंबातले वडील आणि मुलगा यांचा मृत्यू झाला असून, आई आणि मुलगी मृत्यूशी झुंज देत आहेत.

  मृत इंजिनीअर यांचं नाव रवी ठाकरे आहे. तसेच त्यांच्या पत्नीचं नाव रंजना ठाकरे असं आहे.
  रवी ठाकरे एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनीअर म्हणून काम करत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली. त्यांची पत्नी रंजना ब्युटी पार्लर चालवत होती. पण तेही बंद पडलं होतं. त्यामुळे रंजना नैराश्यात गेल्या होत्या. त्यांची मानसिक स्थिती खूपच बिघडली होती.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना ठाकरे यांनी विष घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती शेजारच्या रहिवाशांना सांगितली. तसेच आपल्या पतीने दोन्ही मुलांना मारले असून आम्ही दोघांनीही विष घेतल्याचं सांगितलं. त्यांनी शेजारच्या रहिवाशांना या घटनेची माहिती मिळताच,त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.

  दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची चौकशी केली असता, मृत इंजिनीअर आणि त्यांच्या पत्नीने विष घेतल्यानंतर त्यांनी मुलांनाही मारण्याचा प्रयत्न केला. असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच पोलीस या घटनेची तपासणी करत असून पुढील चौकशी करत आहेत.