मुख्यमंत्री होण्यासाठी ममता बॅनर्जींसमोर आता एकच पर्याय, अशी असेल प्रक्रिया

महाराष्ट्राप्रमाणे विधान परिषदेचा पर्याय मात्र ममता बॅनर्जींकडे नाही. कारण पश्चिम बंगाल हे एकच सदन असलेलं राज्य आहे. बंगालमध्ये केवळ विधानसभा आहे, विधान परिषद नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लढवून जिंकून येण्याशिवाय ममता बॅनर्जींकडे दुसरा पर्याय नाही. 

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. मात्र स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या. त्यांचे जुने सहकारी सुवेंदु अधिकारी यांनी अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जींचा पराभव केला. त्यामुळे गड आला, पण वाघीण हरली, असं वर्णन या निवडणुकीचं केलं गेलं.

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा पराभव स्विकारत असल्याचं म्हटलं असलं, तरी मुख्यमंत्री होण्यासाठी काय करावं लागेल, असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र सध्या ममता बॅनर्जी आमदार नसल्या तरी त्याचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात अडसर येणार नाही. घटनेतील तरतुदीनुसार सर्व लोकनियुक्त सदस्य एकमतांनं त्यांचा नेता निवडू शकतात आणि त्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता येते. त्यानुसार ममता बॅनर्जी सध्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

    मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांत त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून यावं लागेल. यासाठी एखाद्या आमदाराला राजीनामा देण्यास सांगून त्या ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि तिथून ममता  बॅनर्जी जिंकून आल्या, तर त्या विधानसभेच्या सदस्य होऊ शकतात.