भाविकच सुपर स्प्रेडर्स; कुंभमधून परतलेल्यांपैकी ९९ % कोरोना संक्रमित

हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. कित्येक भाविकांसह साधूही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्यानंतर अखेर हा कुंभ आटोपता घेण्यात आला होता. कुंभमेळ्यातील भाविक सुपर स्प्रेडर ठरू शकतात अशी भीती कित्येकांनी व्यक्त केली होती.

    भोपाळ : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने देश हादरून निघालेला असतानाच, मध्यप्रदेशातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हरिद्वारच्या कुंभमेळ्याहून राज्यात परतलेले जवळपास सर्व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

    यांपैकी ६० लोक विदिशा जिल्ह्यातील ज्ञारासपूरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञारासपूरमधील सुमारे ८३ लोक कुंभमेळ्याला गेले होते. परतल्यानंतर त्यांपैकी ६० लोकांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इतर २२ जणांचा शोध घेणे सध्या सुरू आहे. तर केवळ एकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर विदिशा जिल्हा प्रशासनाने या २२ लोकांना शोधण्याचे आदेश दिले आहेत. या लोकांना शोधून, त्यांना विलगीकरणात ठेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यास प्रशासनाने सांगितले आहे.

    हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. कित्येक भाविकांसह साधूही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्यानंतर अखेर हा कुंभ आटोपता घेण्यात आला होता. कुंभमेळ्यातील भाविक सुपर स्प्रेडर ठरू शकतात अशी भीती कित्येकांनी व्यक्त केली होती.

    काही राज्यांनी कुंभवरून येणाऱ्यांना विलगीकरणात राहण्याची सक्तीही केली होती. मध्य प्रदेशनेही कुंभहून परतणाऱ्यांना विलगीकरणाची सक्ती लागू केली आहे. तसेच, हरिद्वारहून परतल्यानंतरही प्रशासनापासून ही गोष्ट लपवून ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.