ट्रेनवाली लव्ह स्टोरी लग्नापर्यंत पोहचली… पण, लग्नात वऱ्हाडाऐवजी अचानक पोलीस आले

गोरखपूर : बहुतेक लव्ह स्टोरीजचा हॅप्पी एंडींग हा लग्नाने होतो. प्रेम विवाहातील लग्नात अनेकदा ट्वीस्ट येतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. येथे एका जोडप्याच्या लग्नात वऱ्हाडाऐवजी पोलिस आल्याने मोठा गोंधळ झाला.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील खुशीनगरमध्ये ही घटना घडली. गुरमिया गावातून कोणीतरी स्थानिक पोलिसांना कळवलं की, गावात गुपचूप विवाह होणार आहे. मुस्लिम मुलगा हिंदू मुलीबरोबर विवाह करणार असल्याचा संशय या व्यक्तीने व्यक्त केला.

सर्कल अधिकारी पियुष कांत राय आपल्या टीमसह विवाहस्थळी पोहोचले. तिथे मौलवी आणि ते जोडपं होतं. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मुलगा आणि मुलगी अल्पवयीन नसून मुस्लिम धर्मीय असल्याचं चौकशीतून स्पष्ट झालं असं खुशीनगरचे एसपी विनोद कुमार सिंह यांनी सांगितले.

गावात लव्ह जिहादची अफवा पसरल्यानंतर पोलीस विवाह रोखण्यासाठी पोहोचले. पण, चौकशी केल्यानंतर मुलगी आणि मुलगा एकाच धर्माचे आहेत तसेच ते अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या मार्गाने होणारे विवाह रोखण्यासाठी अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे. यातूनच या विवाहात गोंधळ झाला.

हे जोडपे पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटले होते. तिथे त्यांची ओळख झाली. त्यानंतर फोनवर त्यांनी बोलणे सुरु केले यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे १३ दिवसांपूर्वी ती आझमगडहून पळून आली होती. अखेर मुलीचे पालकही लग्नाला तयार झाले.