पश्चिम बंगालमधले राजकीय वातावरण तापले, खासदाराच्या ‘त्या’ दाव्यामुळे भाजपमध्ये कलह

: पश्चिम बंगाल(west bengal) भाजपा प्रमुख दिलीप घोष(dilip ghosh) यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाने निवडणूक जिंकल्यास दिलीप घोष बंगालचे मुख्यमंत्री राहतील, असा दावा विष्णुपयूर येथील खासदार सौमित्र खान यांनी केला.

दिल्ली: पश्चिम बंगाल(west bengal) भाजपा प्रमुख दिलीप घोष(dilip ghosh) यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाने निवडणूक जिंकल्यास दिलीप घोष बंगालचे मुख्यमंत्री राहतील, असा दावा विष्णुपयूर येथील खासदार सौमित्र खान यांनी केला. त्यावर शिवप्रकाश, कैलाश विजयवर्गीय आणि अमिताव चक्रवर्तींसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत सौमित्र खान यांना फटकारले आहे.

शिवप्रकाश भाजपाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत. विजयवर्गीय भगवा दलाचे राष्ट्रीय महासचिव असून बंगाल निवडणुकीत त्यांची मोठी भूमिका आहे. त्याचप्रमाणे अमिताव चक्रवर्ती भाजपाचे राज्य महासचिव आहे. सौमित्र खान यांनी दावा केल्यानंतर या नेतयांकडून त्यांना फटकारण्यात आल्याची माहिती भाजपाच्या अंतर्गत सुत्रांकडून मिळाली. तसेच त्यांना विचारपूर्वक वक्तव्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एवढेच नाही तर यानंतर असा खोडसाळपणा केल्यास खासदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी विजयवर्गीय यांनी केली. भाजपा आमदार आणि पक्षाची संसदीय समिती मुख्यमंत्री ठरविणार असल्याचे यावेळी जाहीर सांगण्यात आले.

 विजयवर्गीय ममतांची मागतील माफी : सज्जनसिंह
काँग्रेसचे माजी मंत्री सज्जनसिंह आणि कैलाश विजयवर्गीय यांच्यात तणाव वाढतच आहे. पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांचे पुन्हा सरकार येईल. तसेच विजयवर्गीय ममता बॅनर्जी यांच्या पाया पडून माफी मागत म्हणतील की, तुम्हीच मुख्यमंत्री बना, असे वक्तव्य सज्जनसिंह यांनी केले. त्याचप्रमाणे त्यांनी देश आणि राज्यांमध्ये सुरू असलेल्या शहरांच्या नामांतरावरूनही टीका केली. भाजपाने स्थळांची नावे नाही, तर चांगले कर्म करण्याकरिता विचार करावा. तसेच विंध्याचल प्रदेशच्या मागणीला त्यांनी वैध ठरवित काँग्रेस याचे समर्थन करणार असल्याचे जाहीर केले.

ममतांच्या सभेत शिशिर, दिव्येंदु अनुपस्थित
बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी नंदीग्राम येथे सभेला संबोधित केले. या सभेमध्ये शिशिर अधिकारी आणि दिव्येन्दु अधिकारी सहभागी झाले नाही. दोघांनाही सभेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले नाही, असे तृणमुल सुत्रांकडून सांगितले जात आहे. उल्लेखनीय असेक की, बंगालच्या कांथी येथील खासदार शिशिर अधिकारी यांनी तृणमुल काँग्रेसविरोधात उघडपणे विधाने केली होती. त्याचप्रमाणे तमलुक लोकसभा क्षेत्राचे खासदार दिव्येन्दु अधिकारी यांनी सुद्धा पक्षाच्या कार्यशैलीवरून प्रश्न उपस्थित केले होते. शिशिर अधिकारी हे शुभेन्दु अधिकारी यांचे वडील आहे. तर दिव्येन्दु, शुभेन्दु आणि सौमेन्दु अधिकारी तिघे भावंड आहेत. शिशिर अधिकारी यांची ग्रामीण भागात मोठी पकड आहे. यापूर्वी अधिकारी कुटुबांतील शुभेन्दु आणि सौमेन्दु टीएमसी आणि ममतांशी नाराज होऊन भाजपावासी झाले आहे. अशातच टीएमसी सुद्धा अधिकारी कुटुबीयांशी आता अंतर राखताना दिसत आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी सुद्धा एका सभेत अधिकारी कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केला होता.