पूजा अस्के हत्याकांडात नवा खुलासा, पतीने भावांसोबत मिळून केली गर्भवती पत्नीची हत्या

आठ महिन्यांची गरोदर असलेल्या पूजा अस्के(pooja aske murder case) हिची गेल्या आठवड्यात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचं गूढ उकललं आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या पूजाचा मारेकरी तिचा पतीच निघाला.

    भोपाळ : इंदूरमधील गर्भवतीच्या हत्या प्रकरणाचा खुलासा(pregnant woman murder case) झाला आहे. गर्भवती महिलेची सैनिक पतीनेच हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी पतीला त्याच्या दोघा भावांनी हत्येसाठी मदत केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यापैकी एक भाऊ पोलिसात आहे.

    आठ महिन्यांची गरोदर असलेल्या पूजा अस्के(pooja aske murder case) हिची गेल्या आठवड्यात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचं गूढ उकललं आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या पूजाचा मारेकरी तिचा पतीच निघाला. पूजाच्या पतीने त्याच्या दोघा धाकट्या भावांसह पत्नीची हत्या केली.पूजाचा पती जितेंद्र अस्के ३४ व्या बटालियन कंपनीचा कमांडर आहे. तर दीर राहुल अस्के पोलीस जवान आहे. त्याची पोस्टिंग छिंदवाडामध्ये आहे.

    मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील मल्हारगंज भागात ही घटना घडली. कमला नेहरु कॉलनीतील रामदुलारी अपार्टमेंटमध्ये गेल्या शनिवारी पूजा उर्फ जान्हवी हिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आधी तिच्या दीराचे नाव समोर आले. पोलिसांनी संशयातून दोन्ही दीरांना ताब्यात घेतले होते. पूजाचा नवरा जितेंद्र स्वतःला निर्दोष असल्याचं भासवत होता. पोलिसांनी दीरांकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी हत्येची धडाधड कबुली दिली. दादानेच हत्येचा कट रचल्याचं धाकट्या भावांनी सांगितलं.

    पूजा ही आरोपी जितेंद्रची दुसरी पत्नी होती. धारमध्ये राहणाऱ्या अनू नावाच्या महिलेसोबत जितेंद्रचा पहिला विवाह झाला होता. तिला जितेंद्रपासून मुलंही आहेत. मात्र ही गोष्ट लपवून जितेंद्रने पूजा उर्फ जान्हवीसोबत दुसरा विवाह केला. पूजाला जितेंद्रच्या खोटारडेपणाविषयी समजताच भयंकर चीड आली. तिने थेट अनूला फोन लावला. त्यावरुन दोघींमध्ये वादावादी झाली. अनूने जितेंद्रला फोन करुन मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे  जितेंद्रने पोलीस भाऊ राहुल आणि मावसभाऊ नवीन यांच्यासह मिळून पूजाची हत्या करण्याचा कट रचला.

    पूजाच्या नातेवाईकांनी जितेंद्रवर गंभीर आरोप केले होते. मात्र पोलिसांनी दीर राहुल आणि नवीन यांना अटक केली. जितेंद्रने मात्र आपल्याला काहीच माहित नसल्याचा दावा केला. मात्र चौकशीत दोन्ही भावांनी खरे काय ते सांगितले. पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र अस्के याला अटक केली आहे.