लसीचा अपव्यव टाळणाऱ्या केरळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी केलं कौतुक, ट्विटरवर दिली दाद

    कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एकिकडे लसीचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे लस वाया जाण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. दरम्यान, केरळमध्ये आरोग्य कर्मचारी लसीबाबत सतर्क झाले आहेत. लस वाया जाता कामा नये म्हणून काळजी घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.


    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विट करत माहिती दिली की, “केरळला भारत सरकारकडून लसीचे, ७३,३८,८०६ डोस मिळाले आहेत. आम्ही प्रत्येक कुपीतील उरलेले अतिरिक्त डोस वापरुन, ७४,२६,१६४ डोस दिले आहेत. आमचे आरोग्य कर्मचारी, विशेषत: परिचारिका खूप प्रभावी आहेत आणि कौतुक करण्यास पात्र आहेत”.

    केरळच्या मुख्यमंत्र्यांचे लसीवरील ट्विट पुन्हा रीट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “हे पाहून आनंद वाटतो की आमचे आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांनी लस वाया जाण्यापासून वाचवत एक उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. कोविड -१९ विरूद्ध लढा मजबूत करण्यासाठी लस वाया जाण्यापासून वाचवणे महत्वाचे आहे”, असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.