प्रियांका गांधी ख्रिश्चन असल्याची याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले, सर्वच बाबा विश्वनाथचे भक्त

प्रियांका गांधींनी बाबा विश्वनाथच्या दरबारात जाऊन पूजा केली. याबाबत अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी याचिका दाखल केली होती.

वाराणसी: काशीतील प्रसिद्ध बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दर्शन घेणे तसेच पूजा करण्यावर आक्षेप घेणारी एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती, ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका शिवपूर नटिनियदाई येथील रहिवासी अ‍ॅड. कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी दाखल केली होती. याचिका दाखल करण्यामागील त्यांचा तर्क असा होता की प्रियांका गांधी वढेरा ख्रिश्चन असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. वाराणसीचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस.पी. यादव यांनी ही याचिका फेटाळून लावताना बाबा विश्वनाथ यांना कोणताही जात वा धर्म मान्य नाही असे मत व्यक्त केले आहे. बाबा विश्वनाथ सर्वांचे आणि सर्व बाबा विश्वनाथांचे आहेत असेही कोर्टाने स्पष्ट केले.
मंदिरात सर्वच जाती धर्माचे लोक
कोर्टाने असेही म्हटले आहे की प्रियांका गांधी वढेरादेखील हिंदू भावनेने ओतप्रोत होऊनच तसेच श्रद्धेने मंदिरात दाखल झाल्या होत्या. मंदिरात सर्व जाती-धर्माचे लोक दिसू लागले असल्याने प्रशासकीय कर्मचारी आणि महंत तेथे उपस्थित असल्याने कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या हे सिद्ध होत नाही असे कोर्टाने स्पष्ट केले.

मार्च २०१९ मध्ये घेतले होते दर्शन
उल्लखनीय असे की २०मार्च २०१९ रोजी प्रियांका गांधींनी बाबा विश्वनाथच्या दरबारात जाऊन पूजा केली. याबाबत अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी म्हटले होते, ‘की प्रियांका गांधी वढेरा ख्रिश्चन आहेत. अशा परिस्थितीत बाबा विश्वनाथांच्या दर्शनामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने हे कृत्य केले गेले आहे. म्हणून सर्वांना बोलवून कायदेशीर कारवाई केली पाहिजे. मात्र, सुनावणीनंतर कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.