capt amarinder singh

केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना अखेरपर्यंत आपला विरोध राहिल आणि त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं, तरी बेहत्तर अशी भूमिका घेतलीय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नये, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. नव्या कृषी कायद्यांवर शेतकरी संतापले असून त्यामुळं राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचं त्यांनी म्हटलंय. रोजीरोजीवट होणारा हल्ला शेतकऱ्यांनी का सहन करावा, असा सवाल त्यांनी केलाय. शेतकऱ्यांचा रोष योग्यच असून केंद्र सरकारनं लवकरात लवकर हे कायदे मागे घेतले नाहीत, तर शेतकऱ्यांसोबत देशातला इतर तरूण वर्गही रस्त्यावर उतरेल, असा इशारा सिंग यांनी दिलाय.

“मी राजीनामा द्यायला घाबरत नाही. हे सरकार बरखास्त होण्यालाही मी भीत नाही. पण शेतकऱ्यांवर होणारा अन्याय पाहून मी गप्प बसू शकत नाही”, असं सिंग म्हणाले. पंजाब विधानसभेच्या विशेष अधिवेशनात दुसऱ्या दिवशी केलेल्या भाषणात सिंग यांनी हे विधान केलं. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळीदेखील अन्याय सहन न झाल्यामुळं आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, याची आठवणही त्यांनी या भाषणावेळी करून दिली.

शेतकऱ्यांमधील संताप पाहता पंजाबमधील शांतता हरवत चालल्याचं दिसतंय. ८० आणि ९० च्या दशकात असंच चित्र निर्माण झालं होतं. या अशांततेचा गैरफायदा पाकिस्तान आणि चीन घेऊ शकतात. त्यातून इतर संकटं निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केंद्र सरकारनं करावं, असं आवाहन त्यांनी केलं.