congress Farmers Bill

जयपूर :  राजस्थानात २१ जिल्ह्यांत झालेल्या पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. सत्ताधारी काँग्रेसने ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपाच्या तुलनेत आघाडी घेतली.

रात्री उशीरा हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस २४९ पंचायत समिती सदस्य निवडून आले, तर भाजपाचे २२० पंचायत समिती उमेदवार विजयी झाले. याचबरोबर, अपक्ष आणि इतरांच्या खात्यात ६७ जागा गेल्या. जिल्हा परिषद सदस्यांसाठी काँग्रेसचे ११ आणि भाजपला ५ जागांवर यश मिळाले.

२१ जिल्ह्यांतील ६३६ जिल्हा परिषद आणि ४,३७१ पंचायत समिती सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत यंदा काँग्रेस आणि भाजपासह राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीनेही आपले उमेदवार मैदानात उतरविले होते.

पायलटच्या गडाला भाजपचा सुरूंग

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या अजमेर व टोंक या गडांना भाजपाने सुरूंग लावला. अजमेर जिल्हा परिषदेतील १८ जागांवर भाजपा उमदेवार विजयी झाले. तर, काँग्रेसला १४ जागांवर समाधान मानावे लागले. याचबरोबर, टोंक जिल्हा परिषदेतही काँग्रेसला मोठा धक्का बसला.

सचिन पायलट गटाचे १० सदस्यच येथून विजय संपादन करण्यात यशस्वी ठरले. तर, १५ जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळविला. टोंक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या सुनेलाही येथे पराभवाचा सामना करावा लागला. टोंकमध्ये भाजपच्या ममता जाट यांनी काँग्रेसच्या प्रियंका चौधरी यांचा पराभव केला.