रोमहर्षक सामन्यात RCBचा विजय; डिविलिअर्सच्या झंझावातापुढे मुंबई निष्प्रभ

    चेन्नई : काल झालेला आय़पीएल सामना हा अटीतटीचा बनला हेता. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने धक्कादायक पराभव केला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. कोण जिंकणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं . मात्र बंगळूरने मुंबई इंडियन्सवर मात केली हे सर्वांना पहायला मिळालं. दरम्यान मुंबईने 160 रनाचं आव्हान दिलं होतं ते बंगळूरने शेवटच्या चेंडूवर पुर्ण करुन विजय मिळवला.

    दरम्यांन विराट कोहलीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. रोहित शर्मा आणि ख्रिस लीन जोडीने सुरुवात तर चांगली केली, मात्र दोघांमध्ये चांगला ताळमेळ नसल्यानं रोहितला १५ चेंडूत १९ धावा करुन धावबाद व्हावं लागलं. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या साथीने ख्रिस लीनने डाव सावरला. मुंबई इंडियन्सचं शतक धावफलकावर झळकेल असं वाटत असतानाच जेमीसननं सूर्यकुमारला बाद करत ही जोडी फोडली, त्यानं २३ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकापासून एक धाव दूर असलेला ख्रिस लीनही बाद झाला, त्याने ३५ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या.

    मुंबई इंडियच्या विकेट अगदी ठराविक अंतराने पडत होत्या. हर्षल पटेलच्या या षटकात मुंबईला फक्त १ धाव काढता आली तर या षटकात मुंबईचे चार खेळाडू बाद झाले. आरसीबीकडून हर्षल पटेलनं सर्वाधित ५ विकेट्स घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदर आणि जेमीसनने प्रत्येकी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आरसीबीची टीमची सुरुवातीला कामगिरी चांगली ठरली होती. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मानं वॉशिंग्टन सुंदरचा सोपा झेल सोडला, मात्र वॉशिंग्टनला त्यानंतर फार किमया दाखवता आली नाही तो १६ चेंडूत १० धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारलाही खास करामत दाखवता आली नाही, ८ चेंडूत ८ धावा करुन तो बाद झाला.

    रजतनंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं मात्र मुंबईच्या गोलंदाजांच्या तोडचं पाणी पळवलं. त्याने २८ चेंडूत ३९ धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याआधी २९ चेंडूत ३३ धावा काढून विराट कोहली बाद झाला होता. कोहली-मॅक्सवेल एकापाठोपाठ एक बाद झाल्यानं आरसीबीची सारी जबाबदारी एबी डिविलिअर्सच्या खांद्यावर आली होती, मात्र ३ चेंडूत ३ धावांची गरज असताना तो दुसरी धाव काढण्याच्या नादात धावबाद झाला. डिविलिअर्सने २७ चेंडूत ४८ धावा केल्या. त्यानंतर बंगळुरुला २ चेंडूत २ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात फक्त दोनच विकेट होत्या. मात्र मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलने कोणतीही चूक केली नाही, दोघांनी दोन्ही चेंडूंवर प्रत्येकी एक धाव काढत आरसीबीला विजय मिळवून दिला.