सचिन पायलट यांनी साधला काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क?

राजस्थानमध्ये गेला महिनाभर राजकीय धुसफूस सुरु होती. सचिन पायलट यांनी बंड केल्याने एक सत्ता नाट्यच राजस्थानमध्ये रंगले. आता महिनाभरानंतर सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधून भेटीची वेळ मागितली असल्याची माहिती राजस्थानमधील २ काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबरोबरचे मतभेद वाढल्याने पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवले. पायलट यांनी १८ आमदारांसह जयपूर सोडले होते. महिनाभर हा सगळा गोंधळ सुरु होता. त्यावर पायलट फारसे काही बोलत नव्हते. आता मात्र त्यांनी काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधल्याचे राजस्थानमधील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली असल्याचे समजते. मात्र काँग्रेस नेतृत्व पायलट यांना भेटणार की नाही हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान सचिन पायलट यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. तसेच काही माहिती देण्यासही नकार दिला.