‘गोमुत्र प्या’ कोरोनाला पळवा म्हणणाऱ्य़ा साध्वी प्रज्ञा सिंह यांची तब्येत बिघडली;  कोकीलाबेन रुग्णालयात दाखल

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी गोमुत्र प्या त्यामुळे कोरोनाची लागण होत नाही असा दावा केला होता. तसेच दररोज गोमुत्र प्यायल्याने मला काहीच त्रास होत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

    भोपाळ : आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने एका विमानाने भोपाळहून मुंबईत आणले असून कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हा पंचायत समितीच्या कार्यालयात त्यांची एक बैठक होती, पण तत्पूर्वी त्यांची तब्येत बिघडली.
    यापूर्वीही त्यांची तब्येत बिघडली होती तेव्हा त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  एम्समध्ये दाखल करण्यात आले होते तेव्हा त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती, सुदैवाने त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. जून महिन्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती, त्या बेशुद्ध पडल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गोमुत्र प्या त्यामुळे कोरोनाची लागण होत नाही असा दावा केला होता. तसेच दररोज गोमुत्र प्यायल्याने मला काहीच त्रास होत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.