salman khurshid

सलमान खुर्शीद(Salman Khurshid) यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.लोकसंख्या नियंत्रण(Population Control) कायदा करण्याच्या आधी सरकारने सांगावं की त्यांच्या मंत्र्यांना किती मुलंबाळं आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

    उत्तर प्रदेश सरकारच्या(Uttar Pradesh Government) लोकसंख्या नियंत्रण(Population Control) विधेयकावरुन सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये वादविवाद सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद(Salman Khurshid) यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.लोकसंख्या नियंत्रण(Population Control) कायदा करण्याच्या आधी सरकारने सांगावं की त्यांच्या मंत्र्यांना किती मुलंबाळं आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

    सलमान खुर्शीद आपली पत्नी आणि माजी खासदार लुईस खुर्शीद यांच्या समवेत दोन दिवसीय दौऱ्यासाठी फर्रुखाबाद इथे आले होते. यादरम्यान त्यांनी काही कोरोना तपासणी केंद्रांचं उद्घाटन केलं. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याआधी सरकारने हे जाहीर करा की त्यांच्या मंत्र्यांना किती मुलंबाळं आहेत. त्यानंतर हे विधेयक मंजूर करा.

    उत्तर प्रदेशातल्या नव्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकानुसार, दोनपेक्षा अधिक मुलंबाळं असणाऱ्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत. सरकारी नोकरीसाठी ते पात्र नसतील. तसंच पदोन्नती तसंच सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही.

    राज्य विधी आयोगाने उत्तरप्रदेश लोकसंख्या विधेयक २०२१ चा मसुदा तयार केला आहे. उत्तर प्रदेश राज्य विधी आयोगाच्या मते, राज्य विधी आयोग सध्या राज्यातल्या लोकसंख्या नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याण यासाठी काम करत आहे. त्या दृष्टीनेच ह्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. राज्य विधी आयोगाच्या वेबसाईटवर हा मसुदा उपलब्ध असून १९ जुलैपर्यंत यावर जनतेची मतं मागवण्यात आली आहेत.