हैदराबाद मनपा आणि एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी
हैदराबाद मनपा आणि एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी

मनपाची झालेली निवडणूक अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. एकीकडे भाजपाचा मेगा प्रचार, दुसरीकडे असदुद्दीन ओवेसींच्या एआयएमआयएमच्या हिंदू उमेदवारांचा विजय हे या निवडणुकीचे खरे आकर्षण ठरले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ओवेसींनी पाच हिंदू उमेदवारांना तिकिट दिले होते त्यापैकी ३ उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

हैदराबाद (Hyderabad). मनपाची झालेली निवडणूक अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. एकीकडे भाजपाचा मेगा प्रचार, दुसरीकडे असदुद्दीन ओवेसींच्या एआयएमआयएमच्या हिंदू उमेदवारांचा विजय हे या निवडणुकीचे खरे आकर्षण ठरले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ओवेसींनी पाच हिंदू उमेदवारांना तिकिट दिले होते त्यापैकी ३ उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने या निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली. या निवडणुकीत टीआरएस ५५ जागा मिळवून मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेच्या सारिपाटावर ओवेसी हेच किंगमेकर ठरणार असल्याचे दिसत आहे. यावेळी ओवेसींनी ५१ उमेदवार रिंगणात उतरविले होते व १० टक्के आरक्षणाचे पालन करीत ५ तिकिट हिंदू उमेदवारांना दिले होते. भाजपाने या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकत टीआरएसला एक जोरदार धक्का दिला आहे. भाजपाच्या या यशामुळे टीआरएसला सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. भारतीय जनता पक्षाला आता रोखले नाही तर तेलंगणात टीआरएसचे वर्चस्व कमी करुन भाजपा आपले वर्चस्व वाढवेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी टीआरएस आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष युती करणार अशी चर्चा रंगली आहे.

एमआयएमचीच गरज
या निवडणुकीत टीआरएस मोठा पक्ष ठरला असला व भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या असल्या तरीही टीआरएसला एमआयएमच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. या निवडणुकीत टीआरएसचा जवळपास एक डझन वॉर्डात पराभव झाला आहे. तसेही भाजपाला रोखण्यासाठी टीआरएसला सत्ता स्थापन करण्याच्या मुद्यावर ओवेसींची मदत घ्यावीच लागणार असल्याचेही निश्चित मानले जात आहे.

जेथे-जेथे योगी, शाह गेले तेथे भाजपा पराभूत
निकालानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तोफ डागली.जेथे-जेथे अमित शाह, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव झाला, असे ते म्हणाले. यावेळी ओवेसींनी उप्रचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून टोमणाही हाणला. तुम्ही मुंबईला गेला होतात. तुम्ही अॅक्टिंग नका करू. वास्तवाच्या जगात जा. दलितांवर जे अत्याचार केले ते संपवा. राज्यघटनेच्या विरोधात जात लव्ह जिहाद कायदा बनवत आहात. तो रोखावा, असे ते म्हणाले.

लोकशाहीच्या मार्गानेच देणार लढा
आम्ही भाजपाशी लोकशाहीच्या मार्गाने लढू. तेलंगणाचे लोक भाजपाला राज्यात विस्तार करण्यापासून रोखतील असा आपल्याला विश्वास आहे, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.भाजपला मिळालेले यश हे फक्त एकावेळेचे यश आहे. तेलंगणच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हे यश मिळणार नाही, असे ओवेसी म्हणाले. आम्ही या निवडणुकीत श्रम घेतले होते. तरी देखील हैदराबादच्या जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. महापालिकेची निवडणूक आहे, थोडे वर-खाली होत असते, असेही ते म्हणाले.

टीआरएसपुढे आव्हान
तेलंगणा राष्ट्र समिती बद्दल ओवेसी म्हणाले, टीआरएस आमचा विरोधी पक्ष आहे मात्र, तेलंगणातील तो एक मजबूत राजकीय पक्ष आहे आणि ते स्वीकारावे लागेल. मला विश्वास आहे की, के. चंद्रशेखर राव या निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील. टीआरएस पक्षासाठी एक मोठे आव्हान असेल.

भाजपाला रोखण्याचे तंत्र शिकविले – के. कविता
– टीआरएसच्या वरिष्ठ नेत्या के. कविता यांनी मनपात सत्ता स्थापनेसाठी वेळ असला तरी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी निवडणूक निकालांवर चिंतन करण्याचा सल्लाही नेत्यांना दिला. या निवडणुकीत भाजपा नेत्यांची फौज उतरली होती व मतदारांनाही संभ्रमित करण्यात आले होते असे कविता म्हणाल्या. प्रत्येक ठिकाणी आक्रमक असणे हीच भाजपाची रणनीती आहे; परंतु २०२३ च्या निवडणुकीत आम्ही एक पाऊल पुढेच राहू असे त्या म्हणाल्या. आमचा पक्ष कमजोर नसून या निवडणुकीतच आम्ही भाजपाला सर्वात मोठा पक्ष होण्यापासून रोखले आहे असा दावा करीत हैदराबादने भाजपाला रोखण्याचा मार्ग देशाला दाखविला आहे असेही त्या म्हणाल्या.