३१ मार्चपर्यंत पहिली ते आठवीची शाळा बंद पण… कोणी घेतलाय हा मोठा निर्णय?

भोपाळ  : कोरोनामुळे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या देशभरातील शाळा अद्यापही पूर्णपणे सुरू झालेल्या नाही. केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याबातचा निर्णय राज्य सरकारवर सोपविला आहे. देशभरात कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी नव्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील पहिली ते आठव्या वर्गापर्यंतची शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवाराजसिंह चौहान यांनी घेतला आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा होणार

मध्य प्रदेशात पहिली ते आठवीपर्यंत शाळा बंद राहणार असून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा मात्र होणार आहे. मध्य प्रदेशात कोरोनामुळे ३० मार्च २०२१ पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे त्याचे नियमित वर्ग आता सुरू केले जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले. तर, दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान

शिक्षणाची पातळी सुधारण्यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळांमध्ये केजी वर्ग सुरू केला जाईल आणि १५०० सरकारी शाळांमध्ये केजी १ आणि केजी २ सुरू करण्यात येईल. तर, उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल, अशी माहितीदेखील बैठकीदरम्यान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये 8 ते 12 वीपर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहे. एक दिवस आड कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईत अजूनही शाळा बंद आहेत. 31 डिसेंबरनंतर मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल.

राजस्थानात पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात ४८ % कपात

राजस्थान सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्ण? घेतला आहे. राज्यातील शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी अभ्यासक्रमात ४८ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर अखाऊंटवरून ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये जागतिक महामारी कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत सातत्य कायम ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात ४८ टक्के कपात करून ५२ टक्के निर्धारित केला आहे, अशी माहिती राजस्थान शिक्षण विभागाने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.