मागील दोन महिन्यांत मध्य प्रदेशात मृत्यूचा आकडा एक लाखांच्या पार, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. त्यानंतर कमलनाथ यांनी राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा लपवण्यात येत असल्याचा तसेच राज्यात एक लाखाहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.

    भोपाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी केला आहे. दरम्यान, कमलनाथ यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशमधील राजकारण तापले आहे.

    राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. त्यानंतर कमलनाथ यांनी राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा लपवण्यात येत असल्याचा तसेच राज्यात एक लाखाहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.

    कमलनाथ म्हणाले की, सरकारकडून सांगण्यात येत असलेले आकडे खोटे आहेत. हे आकडे केवळ राज्यालाच नाही तर जगाला फसवण्यासाठी सांगण्यात येत आहे. जेवढे मृतदेह स्मशानात आणि कब्रस्थानात आले त्यामध्ये ८० टक्के मृत्यू हे कोरोनामुळे झालेले मृत्य आहेत असे मानले पाहिजे. नगरपालिका आणि महानगरपालिका हे कोरोनामुळे झालेले मृत्यू नाहीत, असे म्हणताहेत.