पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्याचं मतदान, कोरोनाचाही वाढता आलेख

या टप्प्यात २८४ उमेदवार रिंगणात असून ८६ लाख मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सध्याच्या भाबनीपूर मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सध्या याच मतदारसंघातून निवडून आलेल्या ममता बॅनर्जींनी यंदा नंदिग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. राज्यातील एकूण ३४ जागांसाठी हे मतदान पार पडतंय. पश्चिम बर्धमान, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि कोलकात्यातील मतदार या टप्प्यात मतदान करणार आहेत.

    या टप्प्यात २८४ उमेदवार रिंगणात असून ८६ लाख मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सध्याच्या भाबनीपूर मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सध्या याच मतदारसंघातून निवडून आलेल्या ममता बॅनर्जींनी यंदा नंदिग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. विद्यमान ऊर्जामंत्री सोभानदेव चटोपाध्याय या ठिकाणहून निवडणूक लढवत आहेत.

    दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याचं चित्र दिसतंय. गेले काही आठवडे चाललेल्या निवडणुका आणि स्वैर प्रचार याचा परिणाम दिसायला सुुरुवात झाल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस बंगालमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून कोरोनाची दुसरी लाट जोर धरत असल्याचं चित्र आहे.

    कोरोनाबाबतचे सर्व नियम आणि निकष पाळून मतदान सुरू आहे. मतदारांचे तापमान तपासून आणि त्यांच्या हातावर सॅनिटायझर फवारून मतदारसंघात प्रवेश दिला जात आहे. मतदानासाठी रांगा लावताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलीस नागरिकांना सुरक्षित अंतरावर उभे राहण्याच्या सूचना करत असून मतदान शांततेत सुरू आहे.