धक्कादायक! भावानेच घेतला लाडक्या बहिणीचा जीव

केरळ :  केरळमध्ये एका भावानेच आपल्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी केरळमध्ये कासारगोडा जिह्यात घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाची चाचपणी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मारेकरीचं नाव अलबीन असं आहे. वयवर्ष २२ आहे. तसेच मृत अल्पवयीन मुलीचं नाव ॲना असं आहे. अलबीननं आइसक्रिममध्ये विष केवळ बहिणीला मारण्यासाठी टाकले होते. परंतु ॲनासोबतच तिच्या वडीलांनीही हे विष असलेले आइसक्रिम खाल्ले. आइसक्रिम खाल्यानंतर काही वेळानं दोघांची प्रकृती बिघडली. त्यानंतर या दोघांनाही तात्काळ कुन्नूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ॲनाच्या शरीरात जास्त विष गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अलबीनने याआधीही जेवणात विष टाकून घरच्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो डाव फसल्यामुळे त्याने हा नवीन सापळा रचला होता. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली तेव्हा त्यांना आइसक्रिममध्ये उंदिरांना मारण्याचे औषध सापडले. आरोपीला संपूर्ण कुटुंबाला मारून घरात एकटे राहायचे होते. अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.